दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आज हिंसक वळण घेतले. प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी लाला किल्ल्यावर हिंसेचा तमाशा घडताना संपूर्ण देशाने पाहिला. सर्व शेतकरी नेत्यांनी या हिंसेपासून हात झटकले असताना ह्या हिंसेला शांत करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आवाहन केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहान केले आहे.
“दिल्लीत धक्कादायक घटना घडत आहेत. काही घटकांकडून करण्यात आलेली हिंसा ही स्विकारार्ह नाही. यामुळे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कमावलेली सद्भावना निष्फळ ठरत आहे.” असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हंटले आहे. “शेतकरी नेत्यांनी या हिंसाचारापासून हात झटकले आहेत आणि ट्रॅक्टर रॅली रद्द केली आहे. मी सर्व सच्चा शेतकऱ्यांना विनंती करतो त्यांनी दिल्ली खाली करून सीमा भागात परतावे.” अशी विनंती सिंग यांनी केली आहे. खऱ्या शेतकऱ्यांना विनंती करताना एक प्रकारे त्यांनी आंदोलनात खोटे शेतकरी घुसले आहेत याकडे अंगुलीनिर्देशच केला आहे.
Shocking scenes in Delhi. The violence by some elements is unacceptable. It'll negate goodwill generated by peacefully protesting farmers. Kisan leaders have disassociated themselves & suspended #TractorRally. I urge all genuine farmers to vacate Delhi & return to borders.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) January 26, 2021
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाला शांततापूर्ण मार्गाने ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार होती. दिल्ली पोलिसांनी या शांततापूर्ण रॅलीसाठी परवानगी दिली होती. पण ही रॅली हाताबाहेर जाऊन आंदोलकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला.