कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

उद्धव ठाकरे, शरद पवारांनी जनतेची माफी मागण्याची मागणी

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच पेटलेला असताना महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त ठरत असलेला हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. राज्यात कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे हे पाप महायुती सरकारच्या माथी कशाला हवे? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

महायुती सरकारकडून कंत्राटी भरती सुरू असल्याचे सांगत विरोधकांनी हा मुद्दा धरून ठेवला होता. यावर शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसहित विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय २००३ मध्ये तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने काढला. पुढे २०१०, २०१४ मध्येही तत्कालीन सरकाने जीआर काढले. २०२१ मध्ये ठाकरे सरकारच्या काळातही जीआर काढण्यात आला. हे कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. मात्र, आता हेच याविरोधात आंदोलनासाठी उतरले आहेत. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे ही वाचा:

कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या वेबसिरीजमधून सावरकरांचा जीवनपट उलगडणार

उद्धव ठाकरे, शरद पवारांनी जनतेची माफी मागावी

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरूवात केली ते काँग्रेस यासाठी महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. युवकांची दिशाभूल, तसेच स्वतःचं पाप दुसऱ्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागीतली पाहिजे. ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडं करावं लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Exit mobile version