व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?

व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?

येत्या पाच आणि सहा जुलैला महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी काटेकोर नियोजन केल्याचं दिसतंय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपआपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीकडून सावध पावलं टाकली जात आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपआपल्या आमदारांना फोन करुनही अधिवेशनाला हजर राहण्यासाठी बजावलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी सर्व आमदारांना संपर्क सुरु केला आहे. तीन पक्षाचे प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना फोन करुन संपर्क साधला. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक या विषयाबरोबरच पुरवणी मागण्या, विधेयकं मंजुरी यासाठी सभागृहात बहुमत रहावे यासाठी आमदारांशी संपर्क सुरु आहे.

कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना आरटी-पीसीआर कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी दि. ३ व ४ जुलै, २०२१ रोजी आरटी-पीसीआर कोरोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला

सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू

देवाच्या काठीला आवाज नसतो

अमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Exit mobile version