राज्यात नवीन सरकार स्थापन एक महिना उलटून गेला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, याची चर्चा सुरू असते. या संधीचा फायदा घेत विरोधकांकडून सातत्याने टीका सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर एक दुजे के लिये सरकार अशीही टीका केली असल्याचे पहायला मिळत आहे. औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी अचानक दिल्लीला गेले. या दिल्लीवारीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वाटले पण तसे झाले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार कधी असा प्रश्न पडलेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्याचे उत्तर दिले आहे.
केसरकर यांनी २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हा माझा शब्द आहे असे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आतापर्यंत मोघमच उत्तरे दिली जात होती. परंतु आता खुद्द शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्त्यानेच खुलासा केल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग लवकरच सुकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आता ३ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल असे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बुधवारच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवार राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे हे स्पष्ट संकेत आहेत. जर राज्य सरकार असं नियोजन करत असेल तर त्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ही होणार हे देखील स्पष्ट असल्याचे म्हटले जात आहे.
पवारांची इच्छा लवकरच पूर्ण होणार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारावरून वारंवार टीका करताना दिसून येत आहे. त्यांच्या टीकेलाही केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले, अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. हा माझा शब्द आहे. लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
टिळकांचे शेवटचे छायाचित्र बाबुराव घारपुरे यांच्या कॅमेऱ्यात कैद…
मुंबईत ‘द फ्लॅग कॉपोर्रेशन’ अंतर्गत लाखो तिरंगे…
‘हिंदुत्वविरोधी कनिका धिल्लन लिखित ‘रक्षाबंधन’ बघू नका!’
५जी लिलावात रिलायन्स जिओची बाजी, लावली तब्बल ८८,००० कोटींची बोली
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
पुण्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सध्या सुरू असलेल्या टीकेवर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यात आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.