शनिवार, ११ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाचा माहोल होता. तिथेच गुजरात मधून मोठी राजकीय घडामोड घडली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी तडकाफडकी आपला राजीनामा सादर करून राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांचा हा राजीनामा सर्वांसाठीच अनपेक्षित आणि धक्कादायक होता. त्यामुळे आता गुजरातचे मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. चंद्रकांत पाटील अर्थात सी.आर पाटील हे गुजरात भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. पाटील हे गुजरातमधील नवसारी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. गुजरात भाजपाचा आक्रमक चेहरा म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते. तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचबरोबर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल पटेल यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.
२०२२ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या दृष्टीने अवघ्या वर्षभर आधी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा देणे जनतेसाठी अनपेक्षित होते. पण गुजरातमधील सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने ही खूप विचारपूर्वक केलेली खेळी दिसते. गुजरात मध्ये १९९८ सालापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. गुजरातची जनता सातत्याने भाजपाला निवडून देत आहे. त्यांना अँटी इन्कमबन्सीचा फटका बसलेला दिसत नाही.
निवडणुकीच्या आदल्या वर्षी मुख्यमंत्री बदलण्याचे भाजपाचे तंत्र नवे नाहीह गेल्या वेळीही २०१६ साली भाजपाने मुख्यमंत्री बदलाचा प्रयोग केला होता. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला सांगून विजय रूपाणी यांच्याकडे धुरा सोपवली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुका या रुपाणी यांचा चेहरा पुढे करून लढल्या गेल्या होत्या.
हे ही वाचा:
मंत्रीच महिलांवर अत्याचार करत असतील तर मग गुन्हेगारांना थांबवणार कोण?
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा
…आणि नीरजने आपल्या आईवडिलांना दिला पहिल्या विमानप्रवासाचा आनंद
त्याचप्रमाणे आत्ताही मुख्यमंत्री बदलाचा प्रयोग भाजपाने केलेला दिसतो. सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण त्यांच्या सोबत पुरुषोत्तम रूपाणी यांच्यासारखी इतरही काही नावे चर्चेत आहेत. मोदी यांचे धक्कातंत्र सर्वांनाच परिचित असल्यामुळे मुख्यमंत्रीपदी नेमके कोण विराजमान होणार हे अजूनही निश्चितपणे समोर आलेले नाही.