गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनविरोधात आता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या ४० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केली आहे.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आता कोणत्याही परिस्थितीत राज्यातील दुकाने उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, असे सांगितले. गेल्या ४० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. या काळात राज्य सरकारला आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. ४० दिवसांमध्ये व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. ठाकरे सरकारच्या ‘मुंबई मॉडेल’ची देशभरात चर्चा होते. आता राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सगळं काही अनलॉक केलंच पाहिजे, असे विरेन शाह यांनी सांगितले. त्यामुळे आता ठाकरे सरकार यासंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे ही वाचा:
राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या
संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर
२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यात १५ मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही. त्यामुळे राज्यात ३० मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.