पुण्यातील व्यापारी हे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील विविध भागात या व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले आहे. ठाकरे सरकारने पुण्यातील निर्बंध शिथिल न केल्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ठाकरे सरकारने सोमवारी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार राज्यातील ११ जिल्हे असे आहेत जिथे तिसऱ्या पातळीचे निर्बंध चालू राहणार आहेत. या मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर या ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांतील निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठरवणार आहे.
हे ही वाचा:
सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय
व्वा रे व्वा! मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा !
सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?
सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा
पुणेकरांवर हा अन्याय असल्याचे म्हटले जात आहे. रविवारी व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारला व्यापाऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्यास सांगितले होते. सरकारला त्यासाठी दोन दिवसांची मुदतही देण्यात आली होती. तर निर्णय न घेतल्यास बुधवार, ४ ऑगस्टपासून ७ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा इशाराही दिला होता.
बुधवार पासून दुकाने ७ वाजेपर्यंत खुली करण्याच्या आपल्या निर्णयावर व्यापारी ठाम आहेत. त्यासाठी कारवाई करून अटक केली तरी परिणामांना सामोरे जायची आपली तयारी आहे असे हे व्यापारी सांगतात. तर त्याच्या आदल्या दिवशी सरकारला जागे करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून घंटानाद आंदोलन केले. यावेळी या नागरिकांनी सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेऊन सरकारवर निशाणा साधला आहे. या फलकांवर ‘कारखानदारांना अभय, व्यापाऱ्यांना भय’, ‘मी करतो वर्क फ्रॉम होम, मला खरेदीला वेळ देणार कोण’ अशा प्रकारचे वाक्ये पाहायला मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनाला झालेल्या गर्दीलाही या फलकांमधून टोला लगावला आहे.