ठाणे शहरांतील रस्ते आणि पदपथांवर होणाऱ्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. फेरीवाल्याकडून ठाणे पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारच्या सभेत चांगलेच पडसाद उमटले. ठाणे पालिका क्षेत्रात हप्तेखोरी दिवसागणिक वाढत असल्यामुळे, फेरीवाले वाढत आहेत असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. तसेच फेरीवाला समिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण हे दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याला कारण एकूणच प्रशासनिक व्यवस्था आहे. फेरीवाल्यांना अभय देणारे प्रशासनात बसल्यामुळे फेरीवाल्यांचे फावत आहे. तसेच त्यामुळेच फेरीवाल्याची मुजोरीही दिवसागणिक वाढत चालली आहे. शिवाय हप्ते देत असल्यामुळे फेरीवाले अधिक निर्ढावलेले आहेत.
फेरीवाला धोरण राबवण्यासह शहरात कुठेही अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असे मत स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुद्दा मांडला. काॅंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी उशीर होत असल्याचे सभेच्या सुरुवातीलाच म्हटले. तसेच पदपथ मोकळे व्हायला हवेत असाही मुद्दा त्यांनी मांडला. ठाण्यात फेरीवाल्यांकडून ५०० रुपयांचा हप्ता घेण्यात येतो, असा थेट आरोपही त्यांनी यावेळी बैठकीत सर्वांसमक्ष केला. तर भाजप नगरसेवक नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनीही फेरीवाल्यांची सक्रिय टोळी आहे असे म्हटले. त्यामुळे अनेकजण तक्रार करण्यास घाबरतात असाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा:
कोण होणार अफगाणिस्तान सरकारचा प्रमुख?
शिवाजी पार्कमधील पुत्रंजीवाच्या झाडाचा घेतला जीव
ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक
ठाण्यातील मुजोर फेरीवाल्यांच्या प्रश्नावर याआधी अनेक तक्रारी आलेल्या असतानाही प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केलेले आहे. फेरीवाल्यांना पाठीशी घालणारा कोण, केवळ एक क्लार्क, तेथील अधिकारी की त्यांचा प्रमुख अधिकारी. त्यामुळे आधी अशा प्रमुख अधिकाऱ्यावर कारवाईची गरज अधिक आहे.