बुलढाणा अर्बनची झाडाझडती सुरूच! अशोक चव्हाणांना वाढदिवसाची ‘विशेष भेट’?

बुलढाणा अर्बनची झाडाझडती सुरूच! अशोक चव्हाणांना वाढदिवसाची ‘विशेष भेट’?

राज्यातीलच नाही तर देशातील एक नावाजलेली पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयावर सुरु असलेली आयकर विभागाची चौकशी अद्यापही थांबलेली नाही. पतसंस्थेच्या काही आर्थिक उलाढाली या आयकर विभागाच्या स्कॅनरखाली आल्या आहेत. त्यामुळे आयकर विभागाची हे झाडाझडती गेले २ दिवस सुरु आहे. पण या झाडाझडतीतून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्र सरकार मार्फत विशेष भेट देण्यात येणार आहे का? अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री अशोक चव्हाण यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड पडल्याची बातमी प्रकाश झोतात आली. अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जांच्या अनुषंगाने ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बन पतसंस्थेने कर्ज दिले आहे.

हे ही वाचा:

एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण

रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद

‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पिटलमध्ये

बुधवार, २७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाचे पथक बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. तेव्हापासूनच आयकर विभागाच्या ११ अधिकाऱ्यांचे पथक हे बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयात चौकशी करत असून कागदपत्रांची झाडाझडतीही होत आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे बुलढाणा अर्बन बँकेच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला गेला आहे. कोणालाही कार्यालयात आत सोडले जात नाहीये किंवा कार्यालयातून बाहेरही पडता येत नाही.

Exit mobile version