अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी हजेरी लावली होती. “तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची” हमी देणारा अर्थसंकल्प असा उल्लेख पंतप्रधानांनी ‘बजेट २०२२’ संदर्भात केला आहे. पंतप्रधानांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शिवराज सिंह चौहान यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी अर्थसंकल्पाबद्दल बोलताना म्हणाले, ” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आर्थिक दस्तऐवज अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक वाढ आणि अधिक नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी परिपूर्ण आहे. हा अर्थसंकल्प लोकांसाठी नवीन आशा आणि संधी घेऊन आला आहे. २०२२ चा अर्थसंकल्प देशाला बळकट करणारा आहे.
कोविड-19 आपत्तीच्या दरम्यान या अर्थसंकल्पाने विकासाचा नवा आत्मविश्वास दिला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन संधी निर्माण करणार आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?
‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’
Budget 2022 : गंगाकिनारी रसायनमुक्त शेतीला देणार चालना
Budget 2022: ‘विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प’
या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण करणे, प्रत्येक गरीबाला पक्के घर असावे, नळाला पाणी, शौचालय, गॅसची सुविधा या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही तितकाच भर दिला गेला आहे.
पंतप्रधानांनी असेही सांगितले की, सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला त्यांची सेवा करण्याचा नवीन संकल्प मिळाला आहे. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील भागांसाठी पर्वतमाला येथे नवीन योजना सुरू करण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या योजनेमुळे पर्वतांवर वाहतुकीची आधुनिक व्यवस्था निर्माण होणार आहे.