महाविकासआघाडी सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात एकही नवीन योजना नाही. या अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. “हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा का विशिष्ट भागांचा अर्थसंकल्प म्हणायचा? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. एकूणच या अर्थसंकल्पाने साफ निराशा केली आहे.” असे फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. “आजच्या अर्थसंकल्पात प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आली नाही. तसेच मूळ कर्जमाफी योजनेतही ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्यासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. याशिवाय, सोयाबीन, कापूस बोंडअळीग्रस्त शेतकरी आणि पीकविम्यासंदर्भातही शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच वीजबिलासंदर्भातही शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.” असा दावाही फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा:
“आदित्य ठाकरेंच्या सांगण्याने पब आणि बार बिनधास्त सुरु”- देवेंद्र फडणवीस
“महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य व्याजदराने कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही योजना संपूर्णपणे फसवी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकरी हे लहान आणि कोरडवाहू शेती करणारे आहेत. या शेतकऱ्यांना ५० हजार ते एक लाखांपर्यंतच कर्ज घेणे झेपते. त्यामुळे या कर्ज योजनेचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही.” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.