पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रपतींचे आभारही मानले. राज्यसभेत काही सदस्य आहेत जे कायम कडवट बोलणं आणि इतरांवर टीका करणं इतकंच करत होते, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त केल्या आणि भाषणाच्या सुरुवातीलाचं जोरदार टोला लगावला.
दोन स्पेशल कमांडर नसल्यामुळे खरगेंनी प्रदीर्घ भाषण केलं
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मल्लिकार्जुन खरगेंचे विशेष आभार मानतो. त्यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकलं आणि त्यांचे भाषण ऐकून अतिशय आनंद झाला. आनंद याचा झाला की त्यांनी प्रदीर्घ भाषण केलं. पण, यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे यांना इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं कसं? दोन स्पेशल कमांडर नव्हते. त्यामुळे स्वतंत्रतेचा बराच फायदा खरगेंनी घेतला. पुन्हा अशी संधी केव्हा मिळेल, असं असं खरगेंना वाटलं असेल. त्यामुळे ते इतका वेळ बोलले. अंपायर नव्हता, कमांडो नव्हते त्यामुळे ते षटकार, चौकार मारत होते,” असा सणसणीत टोला नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना लगावला. तसेच खरगे यांनी ४०० जागांसाठी आशीर्वाद एनडीएला दिला त्याचा खूप आनंद झाला. हा आशीर्वाद तुम्हाला परत घ्यायचा असेल तर घेऊ शकता. पण तुमचा आशीर्वाद मी शिरसावंद्य मानतो, असा टोला नरेंद्र मोदी यांनी त्यांना लगावला.
इतकी दशकं राज्य करणाऱ्या पक्षाचे पतन
“पश्चिम बंगालहून काँग्रेसला आव्हान मिळालं आहे की ते ४० जागाही जिंकणार नाहीत. पण, प्रार्थना करतो की काँग्रेसला ४० जागा वाचवता आल्या पाहिजेत. काँग्रेस पक्ष हा आऊटडेटेड झालेला आहे. देशावर इतकी दशकं राज्य करणारा पक्ष आणि त्याचं असं पतन होतं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल संवेदना आहेत. ऐकून घेण्याची क्षमताही काँग्रेस पक्ष गमावून बसला आहे,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेसकडून सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीची गळचेपी
“काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीची गळचेपी केली आहे. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने आलेली सरकारं बरखास्त केली आणि देशाचं संविधान, मर्यादा पाळणाऱ्या लोकांना गजाआड केलं. काँग्रेसने वृत्तपत्रांचा गळा घोटला. काँग्रेस देश तोडण्याचे नॅरेटिव्ह रचत गेला. आता हा काँग्रेस पक्ष लोकशाही शिकवत आहे. ज्या काँग्रेसने जात, पात आणि भाषा यांच्या नावे देश तोडला. दहशतवाद आणि फुटीरतावादाला जन्म घालणारे हेच लोक आहेत. काँग्रेस काळात नक्षलवाद हे एक मोठं आव्हान झालं आहे. देशाची मोठी जमीन यांनी शत्रूच्या हाती सोपवली. आज तेचं आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यावर भाषणं देत आहेत?” असे बोलत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ
कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!
उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?
‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’
इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यासाठी मोदींची वाट का बघावी लागली?
“भारताला स्वातंत्र्य मिळूनही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर इंग्रजांनी तयार केलेली दंड संहिता का बदलली नाही? इंग्रजांच्या काळातले शेकडो कायदे का बदलले नाहीत? भारताचं बजेट संध्याकाळी पाच वाजता मांडलं जात होतं कारण ब्रिटन संसदेत त्यावेळी सकाळचे नऊ वाजलेले असायचे. त्या वेळेला अनुसरुन ही परंपरा सुरू होती. सैन्यांच्या चिन्हांवर गुलामीची प्रतीकं का होती? तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यासाठी मोदींची वाट देशाला का बघावी लागली? अंदमान आणि निकोबार या द्विपसमूहांवर इंग्रजी सत्तेचं निशाण का होतं? इंग्रजांच्या प्रभावाखाली नव्हतात तर भारताचा उल्लेख कुठेही मदर ऑफ डेमोक्रसी का केला नाहीत?” असे अनेक सवाल नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससमोर उपस्थित केले.