ब्रिटिश परराष्ट्र सचिवाचा फाटक्यात पाय…

ब्रिटिश परराष्ट्र सचिवाचा फाटक्यात पाय…

दहशतवाद, बेरोजगारी, महागाई, लोकसंख्या, गुन्हेगारी, घुसखोरी असे स्वतःच्या देशातील धगधगणारे अनेक प्रश्न बाजूला ठेवून ब्रिटीश लोकप्रतिनिधी दुस-याच्या फाटक्यात पाय घालण्याचा प्रयत्न करतायत. एकेकाळी तुमची संपत्ती ही आमचीच असं म्हणत भारताची लूट करणारे आज भारतीय प्रश्नही आमच्या राजकारणाचा भाग असल्याचा अजब दावा करतायत.

भारतातील शेतकरी आंदोलनाला विदेशी रसद मिळते आहे ही काही छुपी गोष्ट नाही. ब्रिटन मधेही या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर मोर्चे निघाले. ब्रिटनच्या ३६ खासदारांनी या विषयी ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. या प्रश्नात ब्रिटीश सरकारने हस्तक्षेप करावा अशी उफराटी मागणीही केली होती.

 

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब हे भारत दौऱ्यावर असताना “शेतकरी आंदोलन हे ब्रिटिश राजकारणाचा भाग आहे” अशी मुक्ताफळे उधळली. या दाव्याचे लंगडे समर्थन करण्यासाठी त्यांनी ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्य करणा-या भारतीय वंशाच्या लोकांचा आधार घेतला आहे.

 

या भारतीय वंशाच्या लोकांचा आधार घेत भारतातील अंतर्गत प्रश्नांवर भाष्य करण्याचा आगाऊपणा ब्रिटनने न केलेलाच बरा, कारण ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळात नाही असे ब्रिटीश साम्राज्य दशकांपूर्वी संपले. सध्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देताना ब्रिटीश सत्ताधा-यांची दमछाक होताना दिसते आहे. त्यामुळे भारताची चिंता सोडून त्यांनी घराची काळजी घेतलेली बरी.

Exit mobile version