महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणारे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी नार्को टेस्ट देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांनी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही नार्को टेस्ट करा, अशी अट घातली आहे.
‘मी स्वत:ची नार्को टेस्ट, पॉलिग्राफी टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास तयार आहे. मात्र माझी अट आहे की, माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही टेस्ट व्हावी. जर दोन्ही कुस्तीपटू त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील तर तशी घोषणा त्यांनी पत्रकारांना बोलावून करावी. मग मीही वचन देतो की, मी या टेस्टसाठी तयार आहे
बृजभूषण शरण सिंह, खासदार, कैसरगंज. मी आजही माझ्या मतावर ठाम आहे आणि कायम राहीन, असे वचन मी देशवासींना देतो,’ असे त्यांनी फेसबुकवर जाहीर केले आहे.
बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये पुनिया आणि फोगट यांचाही समावेश आहे. बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बृजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ते २३ एप्रिलपासून जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत.
यापूर्वी ७ मे रोजी, बृजभूषण यांनी माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला तर स्वत:ला फाशी देईन, असे जाहीर केले होते. ‘आंदोलनकर्ते कुस्तीपटू वगळता अन्य कोणाही कुस्तीपटूंना विचारा की, मी कधी त्यांच्याशी गैरवर्तन केले आहे का? मी कुस्तीसाठी, या देशासाठी माझी ११ वर्षे दिली आहेत,’ असे त्यांनी आधी म्हटले होते.
कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींवरून २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले आहेत.
हे ही वाचा:
पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला
…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!
कोल्हापुरातील खाशाबा जाधवांचा विजय स्तंभ झाला ‘पराभूत’
अपघातानंतर अपंगत्व आलेल्या तरुणाला मिळाली दीड कोटीची भरपाई !
रविवारी जंतरमंतर येथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांचीही यावेळी बैठक झाली. कुस्तीपटूंच्या आंदोलनाची पुढील दिशा खाप पंचायत ठरवणार आहे. २१ मेपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते.