महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी हा हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे.
१ मार्चपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकास महामंडळांचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरले आहे. पण राज्यपाल जोपर्यंत बारा आमदारांची नियुक्ती करत नाहीत तोपर्यंत महामंडळाचा निर्णय घेणार नाही अशी आडमुठी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय झाल्याचेही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले.
हे ही वाचा:
याच महामंडळाच्या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार विधिमंडळात आक्रमक झाले. अजित पवार यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी लवकरात लवकर विकास महामंडळ स्थापन करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. पण आद्यपही त्यांनी ते आश्वासन पाळलेले नाही. सभागृहात एखाद्या गोष्टीचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवला आहे.