भारताकडून ब्राझिलला संजीवनी

भारताकडून ब्राझिलला संजीवनी

जगात थैमान घातलेल्या कोविड-१९ महामारीवर भारतीय बनावटीच्या कोविशील्डच्या लसीमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. भारताने शेजारधर्म दाखवत यापूर्वीच या लसीचे काही डोस नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी राष्ट्रांना दिले होते. त्याशिवाय इतरही काही आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांना या लशीचा लाभ मिळणार होता. आता या यादीत दक्षिण अमेरिकेतील ब्राझिलचा देखील समावेश झाला आहे. त्याबद्दल ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सेनारो यांनी संजीवनी घेऊन येणाऱ्या हनुमानाचे चित्र ट्वीट करत भारताचे आभार मानले आहेत.

शुक्रवार २२ जानेवारी रोजी, सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या लशीचे डोस घेऊन जाणाऱ्या दोन विमानांनी उड्डाण केले. कोविशील्ड या भारतीय बनावटीच्या लशीचे डोस घेऊन एमिरेट स्काय कार्गोच्या विमानाने दोन दशलक्ष डोसेससह ब्राझिलसाठी उड्डाण केले तर रॉयल एअर मारोकच्या विमानाने दोन दशलक्ष डोसेससह मोरोक्कोसाठी उड्डाण केले, असे विमानतळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबरोबच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी कोविशील्ड पोहोचवण्याची व्यवस्था विमानतळाने केली असल्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी या बाबत बोलताना सांगितले की भारत मित्र देशांना देणाऱ्या मदती अंतर्गत विविध देशांत कोविशील्ड लशीच्या खेपा पोहोचवल्या आहेत. यात भूतान, मालदिव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि सेशेल्स या देशांचा समावेश होतो. पाकिस्तानला कोविशील्ड देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारी किंवा खासगी पातळीवरून त्यांच्यातर्फे लशीसाठी कोणतीही मागणी अद्यापी करण्यात आलेली नाही.

Exit mobile version