शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

आचार्य बाळाराव सावरकर यांनी चार प्रदीर्घ खंडांत लिहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट म्हणून मिळाले. मुंबईतील एका उद्योजकाने हा ग्रंथ शरद पवार यांना भेट दिला.
६ जनपथ या पवारांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी उद्योजक प्रशांत करूळकर यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांना हा चरित्रग्रंथ भेट दिला.

आचार्य बाळाराव सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे चरित्र चार खंडांत प्रकाशित केलेले आहे. रत्नागिरी पर्व (१९२४ ते १९३७), हिंदुमहासभा पर्व (१९३७ ते १९४७), अखंड हिंदुस्थान लढा पर्व (१९४१ ते १९४७), सांगता पर्व (१९४७ ते १९६६) असे हे चार खंड आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वीय सचिव म्हणून आचार्य बाळाराव सावरकर हे १५ वर्षे सावरकरांसोबत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आचार्य बाळाराव सावरकर यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याचे स्वामित्व हक्क बाळाराव सावरकर यांना दिले. सावरकरांचे हे साहित्य समग्र सावरकर या नावाने प्रकाशित करण्याचे आव्हान बाळाराव सावरकर यांनी स्वीकारले. हे मूळ खंड ४८ वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. आता ते पुनर्प्रकाशित करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर काँग्रेसने वारंवार सावरकरांची बदनामी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सावरकरांबद्दल नेहमी अभद्र भाषेत टीका केली आहे. राहुल गांधी किंवा इतर काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांचा शरद पवार यांनी कधीही निषेध केला नाही की त्याला विरोध केला नाही.

हे ही वाचा:

करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी ठाकरे सरकारमधील मंत्री?

महाराष्ट्रात आता बैल धावणार

रामदास कदम यांना शिवसेनेचे दरवाजे बंद?

बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव

 

मुंबईच्या दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे उद्घाटन झाले, तेव्हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाबद्दल, त्यांच्या देशभक्तीबद्दल शरद पवार यांनी अभिमान व्यक्त केला होता. ते भाषण आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून वाद निर्माण झाला. नाशिक ही सावरकरांची जन्मभूमी असतानाही त्यांचे नाव संमेलनस्थळी कुठेही देण्यात आले नव्हते. याच साहित्य संमेलनात शरद पवार यांनी समारोपाच्या भाषणात सावरकर हे विज्ञानवादी होते, त्यांच्याविषयी वाद उत्पन्न होणे योग्य नाही, त्यांचे साहित्य अजरामर होते, त्यांच्या त्यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही, असे म्हणत सावरकरांच्या देशभक्तीचे कौतुक केले.

त्यामुळे बाळाराव सावरकरांनी लिहिलेले स्वातंत्र्यवीरांचे हे प्रदीर्घ चरित्र शरद पवार नव्याने वाचतील आणि सावरकरांची बदनामी करणाऱ्यांना समज देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version