पंचवीस वर्ष सत्तेनंतरही मुंबई ‘खड्ड्यात’, भाजपा नगरसेवकांनी केले बीएमसीबाहेर निदर्शन

पंचवीस वर्ष सत्तेनंतरही मुंबई ‘खड्ड्यात’, भाजपा नगरसेवकांनी केले बीएमसीबाहेर निदर्शन

“शिवसेना मुंबई महापालिकेत १९९६ ते २०२१ अशी सलग पंचवीस वर्षांपासून महापौरपदी विराजमान आहे. सत्ताधारी शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत मुंबईकरांसाठी अनेक वचनं दिली. मात्र, प्रत्यक्षात ती वचनं पूर्ण केली नाहीत.” असे भाजप नगरसेवकांनी सांगितले आहे. शिवसेनेला त्यांच्या वचनांची आठवण करून देण्यासाठी भाजपचे नगरसेवक मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर एकवटले. त्यांनी सर फिरोजशाह मेहता पुतळ्यासमोर शिवसेनेविरोधात मूक निदर्शने केली.

“पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांमध्ये ‘जे बोलतो ते करतो’ असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, तब्बल पंचवीस वर्ष उलटूनही मुंबईकरांच्या हाल-अपेष्टा संपलेल्या नाहीत. दि. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर सोळा वर्षांत वीस हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपये पूर नियंत्रणासाठी खर्च केल्यानंतरही व दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होते.” अशा शब्दात भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी निशाणा साधला.

हे ही वाचा:

“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे.”

सर्वसामान्य मुंबईकराच्या भावनेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकर जनताच धडा शिकवेल अशी सडकून टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केली. या मूक आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, अभिजित सामंत, अतुल शाह, नगरसेविका शितल गंभीर–देसाई, समिता कांबळे, नेहल शाह, कृष्णावेनी रेड्डी, सुरेखा लोखंडे, व अन्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

Exit mobile version