काही वर्षांपूर्वी मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीविरोधात शिवसेनेने आवाज उठवला होता. मात्र, आता शिवसेनेच्याच नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात नवी मुंबईतील वाशीमध्ये तब्बल ३९० झाडे तोडण्याचे चित्र आहे. उड्डाणपूल उभारण्यासाठी काही झाडे मुळासकट कापण्याचे आणि उर्वरित झाडे अन्यत्र स्थलांतरित करण्याचा मानस आहे. मात्र, झाडांना स्थलांतरीत करणे हे केवळ दाखवण्यासाठी असल्याचे म्हणत पर्यावरणप्रेमींनी उड्डाणपुलाला विरोध केला आहे.
पामबीच मार्गाशी संलग्न असलेल्या रस्त्यावर तीन किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने महात्मा फुले जंक्शन- अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल या मार्गावरील सहा वृक्ष तोडण्याचेआणि ३८४ झाडे अन्यत्र स्थलांतरित करण्याचे नियोजन केले आहे. याला आता पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. झाडांचे पुनर्रोपण ही धूळफेक असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे, या वृक्षतोडीची मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागालाच घाई झाली असून, सात दिवसांच्या आत त्याबाबत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन या विभागाने केले आहे.
महापलिकेच्या या प्रक्रियेवरही संशय घेतला जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांना याची माहिती मिळावी, यासाठी पालिकेने त्यासंबंधी व्यापक स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात एका स्थानिक वृत्तपत्रात ही जाहिरात देण्यात आली. तसेच झाडांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या. त्यामुळे या प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
‘संबंधित प्रकल्पात २०० पेक्षा अधिक झाडे कापली जाणार असल्यामुळे यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक असून वृक्षांचे पुनर्रोपण योग्य पद्धतीने होईल याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार
पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही
मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता
मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा
‘बेकायदा पार्किंगचा प्रश्न सोडविला तरी रस्त्यावरील वाहन कोंडी संपुष्टात येणे सहज शक्य आहे अशा मार्गावर ३६३ कोटी खर्च करून आणि ३९० झाडांची कत्तल करून महापालिका कोणाचे हित साधणार आहे, हा प्रश्न सामान्य नवी मुंबईकरांना पडला आहे,’ अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण समितीच्या माजी अध्यक्षा दिव्या गायकवाड यांनी दिली आहे.