कोरोनामुळे शाळा बंद असताना देखील मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन वर्षांसाठी शालेय पोषण आहारासाठी कंत्राट दिल्यामुळे महानगरपालिकेवर टीका करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शाळा बंदच आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या ऑनलाईन मार्गाने होत आहे. मात्र तरीही, महानगरपालिकेने तीन वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट विविध स्वयंसेवी संस्थांना देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीकडे पाठवला आहे. स्थायी समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र बंद असलेल्या शाळांमध्ये पोषण आहाराचा घाट घातल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
हे ही वाचा:
संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
दूध का दूध, पानी का पानी होईलच – गिरीश बापट
भाजपाची सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार
यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर सडकून टिका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे, ‘कोरोनामुळे महापालिकेच्या शाळा बंद असताना देखील पुढील ३ वर्षांसाठी विद्यार्थ्यांच्या दुपारच्या पोषण आहाराचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा महाटक्केवारी भ्रष्टाचारी पराक्रम फक्त सत्ताधारी शिवसेनाच करू शकते…’
गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर टाळेबंदी करण्यात आली होती. सध्या परत एकदा, मुंबईत वेगाने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टाळेबंदी जाहिर होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.