एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवालाने दिले आहे. पालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडे जर मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल शंका उपस्थित करून त्यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी ट्विटरवर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र आणि निकाहनाम्याची प्रत प्रसिध्द केली होती. त्यानंतर आरोप- प्रत्यारोपानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले होते.
हे ही वाचा:
महात्मा गांधींनी कधीही भगतसिंह, नेताजी बोस यांना पाठींबा दिला नाही
भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेला एक कोटीचा भुर्दंड!
विनोदाच्या नावाखाली वीर दासकडून अमेरिकेत भारताची बदनामी; मुंबईत तक्रार
समुद्रातील पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याआधी हे तर करा!
या प्रकरणात महापालिकेकडून वानखेडें संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली होती. पुढील पडताळणी दरम्यान समीर वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर महापालिकेने ही सर्व कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या त्रुटी असलेल्या कागदपात्रांमुळे न्यायालयाचा निर्णय वानखेडे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. मात्र, या वृत्ताला पालिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र, पालिकेने कोर्टात कागदपत्रे सादर केल्याने उद्या न्यायालयाकडून काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.