एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे गटाच्या सरकारी कार्यालयांवरही कब्जा करायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी नागपूर विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वर्षानुवर्षे असलेले कार्यालय ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पालिकेमध्ये दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयावरही शिंदे गटाने ताबा मिळवला आहे.
बुधवारी सायंकाळी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेवक यशवंत जाधव आणि नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे कुटुंबीयांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचा मुद्दा असलेले मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेतले. या नंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
या घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येथील मुख्यालयातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये सील केली आहेत. बुधवारी मुख्यालयात घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार पालिकेने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार तळमजल्यावरील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये सील करण्यात आली असल्याचे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट बुधवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील नागरी मुख्यालयात आमनेसामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करेपर्यंत तासभर महापालिका आवारात तणाव निर्माण झाला होता. नागरी प्रशासनाने महापालिका मुख्यालयातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची कार्यालये सील केली असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या पक्ष कार्यालयात बुधवारी शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बंडखोरी करत ४० आमदार फोडून बारा खासदारांना आपल्यासोबत घेतले. त्यानंतर हळूहळू पक्ष काबीज करण्याची मोहीम सुरू केली. ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. मागच्या महिन्यात शिंदे गटाने शिवसेनेचा मंत्रालया येथील पक्ष कार्यालय समोर आपले कार्यालय स्थापन करून धक्का दिला होता. आता थेट शिंदे गटाने मुंबई महापालिकेत धडक मारत शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेऊन उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.