मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनं १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. पण पुन्हा एकदा पहिल्याच पावसात मुंबईकरांनी दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय.
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 9, 2021
“पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई”, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केलाय.
सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी १०७% तर कधी १०४% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे.
हे ही वाचा:
महापालिकेने पाच वर्षात हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून आज मुंबईची ही अवस्था झाली
महापालिकेचे दावे १२ तासांत धुवून निघाले
कोवॅक्सिन लस डेल्टा, बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी
मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काल मंगळवारी मुंबईतल्या विविध एजन्सीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यानंतर पालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून मुंबईत १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३ लाख ११ हजार ३८१ मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत ३ लाख २४ हजार २८४ मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं होतं.