पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने महापालिका आणि शिवसेनेला घेरलं आहे. शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी १०७% तर कधी १०४% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे.
डेब्रिजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात… आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात!, अशी टीका करतानाच आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले होते. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ९ वाजून ५० मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.