महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना आकडेवारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध आणत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत २ एप्रिलपासून निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. पण यावर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. अशाप्रकारचे निर्बंध आणलेत तर आंदोलन करू असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे. ही मागल्या दाराने आणलेली ताळेबंदीच आहे असे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना फोफावत चालला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. राजधानी मुंबईही याला अपवाद नसून मुंबईत आता कोरोना रुग्णांना खतांची कमतरता जाणवू लागली आहे. या सगळ्यांचे खापर महाराष्ट्राच्या जनतेवर फोडत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी नियोजन करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सध्या महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७ संचारबंदी लावण्यात आलेली आहे. पण आता मुंबईत निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याविषयीचे सूतोवाच केले आहे. धार्मिक स्थळे, मॉल्स हे संपूर्ण बंद होतील आणि बाकीची दुकाने ५०% क्षमतेने चालू राहतील असे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यासोबतच वर्क फ्रॉम होम आणि सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी येऊ शकते.
हे ही वाचा:
जीएसटीचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न गोळा
गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा
यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारचे हे निर्बंध म्हणजे मागल्या दाराने आणलेला लॉकडाऊन आहे असे टीकास्त्र भातखळकर यांनी डागले. सरकारने असे काही निर्बंध आणले तर आम्ही आंदोलन करू असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. धार्मिक स्थळे बंद पण महापौर बार बद्दल काहीच बोलल्या नाहीत. बार मात्र चालू ठेवणार. असे भातखळकर म्हणाले. हे निर्बंध आणणे म्हणजे लोकांवर खापर फोडून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कंत्राट घेऊन, खंडण्या वसूल करून पैसे कमावता, लॉक डाउनमध्ये सर्वसामान्य नागरिकाने कसे जगायचे? लॉक डाउन जाहीर केला तर आंदोलन करू हे निश्चित. pic.twitter.com/1YjzarJMbp
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 1, 2021
आपल्या मुलाला, जावयाला काँट्रॅक्ट्स मिळवून द्यायचे, वाझेकडून हफ्ते वसूल करायचे पण सर्वसामान्यांना वेठीला धरायचे असे या सरकारचे धोरण आहे. लॉकडाऊन लावला तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. त्यामुळे जर सरकारला लॉकडाऊन करायचा असेल तर आधी प्रत्येक सामान्य मुंबईकराच्या खात्यात दहा हजार रुपये टाका आणि मग काय करायचे ते करा असे भातखळकर म्हणाले.
वर्षभरा पूर्वी लॉक डाउन जाहीर करावा लागला कारण कोविड बद्दल जगाला माहिती नव्हती. आज लस आणि बाकी सुविधा उपलब्ध असताना पुन्हा लॉक डाउन हवाय कशाला? ठाकरे सरकारला फक्त आपले अपयश झाकण्यात रस आहे. pic.twitter.com/FI6u7ndLG3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 1, 2021