कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्याची कंपाउंड भिंत पाडण्यासाठी मुंबई पालिका टाळाटाळ करत असल्याचे निरीक्षण लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी नोंदवले आहे. जुहू येथील रस्ता रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचे कंपाउंड पाडले जाणार आहे. कंगना रानौत हिच्या कार्यालयावर अगदी तत्परतेने कारवाई करणारी मुंबई महानगरपालिका बच्चन यांच्या घराच्या कारवाईसंदर्भात गप्प असल्याचे चित्र आहे. कंगना रानौत हिने केलेल्या काही वक्तव्यांवरून तिच्याबद्दल राजकीय वैमनस्य ठेवून पालिकेने ही कारवाई केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, अमिताभ यांच्या घराच्या कंपाउंड भिंतीबद्दल पालिकेची टाळाटाळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

भिंत तोडण्याच्या कामाला किमान एक वर्षाचा विलंब झाला असून, नागरी संस्थेने उपअभियंता (रस्ते) पश्चिम उपनगर यांच्या नावाने नोटीस जारी करावी, असे महाराष्ट्र लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरावर कारवाई न करण्याचे कारण न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा रस्ते रुंदीकरण सुरु होईल; तेव्हा त्यासाठी तरतूद करण्यात येईल. पालिकेकडून या कामासाठी मुद्दाम उशीर केला जात असून पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता ३० मे नंतर कोणतेही पाडकाम केले जाणार नाही. त्यामुळे पुढच्या आणखी एका वर्षासाठी जमीन अधिग्रहण लांबवले जाणार आहे आणि हे चूक आहे, असे लोकायुक्त यांनी म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडून अद्याप जमिनीचे अधिकग्रहण करण्यात आले नसल्याचे पालिकेने सांगितले आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या इतर बंगल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. रस्ते रुंदीकरणासाठी जेव्हा कंत्राटदार नेमण्यात येईल तेव्हा पुढच्या आर्थिक वर्षात बच्चन यांच्याकडून जमीन घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

हे ही वाचा:

जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे   

या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलीप मिरांडा यांनी “अमिताभ बच्चन यांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या बंगल्यांवर कारवाई केली जात आहे मग अमिताभ बच्चन यांच्या घराचे कंपाऊंड का तोडले जात नाही?” असा सवाल उपस्थित केला. आता लोकायुक्तांनी पालिकेने दिलेले स्पष्टीकरण अमान्य केले असून रस्ते विभागाला याबाबात उत्तर देण्यास सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला रस्त्यालगत आहे. हा रस्ता ४० फुटांवरून ६० फुटांचा करण्यात येणार आहे. मात्र, सध्या कंत्राटदार नसल्याने रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही.

Exit mobile version