राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लवकरच मोफत लसीकरण करण्यात येईल, असे ट्विट शनिवारी केल्यानंतर त्यावरून आता महाविकास आघाडीमध्येच जुंपली आहे. काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लसीकरणासाठी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यावर नाराजी प्रकट केली आहे. पत्रकार परिषदेत थोरात यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे लसीकरण मोफत करण्यासंदर्भात विचार करत आहेत. पण श्रेय घेण्यासाठी कुणी तसे जाहीर करत असेल तर त्यावर काँग्रेसची नाराजी आहे.लस मोफत उपलब्ध व्हायला हवी असे आमचे आधीपासूनच म्हणणे आहे.
हेही वाचा:
ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली
अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत
अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल
शनिवारी नवाब मलिक यांनी ट्विट करून महाराष्ट्रात आता मोफत लसीकरण होणार असे जाहीर केले होते. तसेच ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले होते. पण नंतर ते ट्विट मागे घेत त्यांनी सध्या यावर विचार होत असून गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ट्विट मागे घेत असल्याचे दुसरे ट्विट करून जाहीर केले. एकूणच महाराष्ट्रातील जनतेच्या मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येच एकवाक्यता नाही, हे स्पष्ट झाले.
विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीत या लसीकरणाबाबत एकवाक्यता नाही, अशी टीका केली.
‘राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे’ असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी शनिवारी आपल्या नव्या ट्विटमध्ये केला होता. शिवाय, ही मोफत लस सरसकट सर्वांनाच मोफत आहे की, केवळ १८ ते ४५ या वयोगटातील लोकांसाठीच ती मोफत आहे? हादेखील गोंधळ आहेच.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लसीकरणासाठी जागतिक निविदा मागविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातून आता लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात होण्याचे संकेत आहेत. पण आता यात खरे काय हा प्रश्न आहे.