राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध भाजपा हा राजकीय सामना दिवसेंदिवस जास्तच आक्रमक होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांवर आरोप करत १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसोबत व्यवहार केल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मलिकांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. युवा मोर्चा तर्फ़े राज्यभर नवाब मलिकांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजयुमोचे शेकडो कार्यकर्ते नवाब मलिकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयाच्या बाहेर नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. नवाब मलिक यांची सरकार मधून हकालपट्टी करण्यात यावी आणि नवाब मलिकांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात या मागण्यांना घेऊन युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.
या सोबतच औरंगाबाद येथे नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौक परिसरात शेकडो भाजपा कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी नवाब मलिकांच्या विरोधात हे आंदोलन छेडले. तर भोकर येथे देखील भाजपा कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले आहे.
या सोबतच पुणे, नागपूर, मुंबई या विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. तर नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेरही नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.