राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभर जोर धरत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा आमदार रोज मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु आहे. तर आज भाजपा मार्फत आज विराट मोर्चा काढला जाणार आहे.
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयामार्फत त्यांना अटक करण्यात आली होती. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप मलिकांवर आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक अधिकार नाही असा दावा भाजपा करत आहे.
त्यामुळेच भाजपमार्फत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजपाचा आज मुंबईत मोर्चा निघणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. मुंबईतील आझाद मैदान येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून मेट्रो सिनेमा सर्कलपर्यंत हा मोर्चा असेल.
हे ही वाचा:
सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
हजारो पात्र खातेदारांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही
महिला दिनाच्या दिवशीच महिला बचत गटाचे हॉटेल पेटवले!
या मोर्च्याच्या निमित्ताने राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते आणि नेते मुंबईच्या दिशेने निघाले असून आझाद मैदानात गर्दी जमू लागली आहे. हजारोंच्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते या मोर्चासाठी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे भाजपाच्या या मागणीपुढे ठाकरे सरकार झुकणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. या मोर्च्यात भाजपाचे राज्यातील सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदार, इतर नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.