पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संसदेत ‘अबकी बार ४००पार’चा नारा दिला आहे. भाजप एकटा ३७० जागा मिळवेल आणि एनडीएच्या घटक पक्षांना मिळून ४००हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. जेडीयूशी आघाडी केल्यानंतर आता भाजपने तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि अकाली दल यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. तर, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी यांच्याशीही चर्चा सुरू आहे.
सन २०१९मध्ये एनडीएशी काडीमोड घेणारे टीडीपीचे चंद्राबाबू नायडू बुधवारी दिल्लीत आले होते. तेव्हा त्यांनी सर्वांत आधी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मध्यरात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्याचवेळी अकाली दल पक्षालाही एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनीही पंजाबमधील आघाडीसाठी भाजपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केल्याचे समजते. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष संघर्ष करत आहेत.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवालांना मोठा झटका, १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश!
सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’
शरद पवार गटाला मिळाले नवे नाव… नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवंगत जाट नेते चरणसिंह चौधरी यांचे वंशज जयंत चौधरी यांच्याशीही सकारात्मक चर्चा सुरू आहे. याबाबत केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे मानले जाते. राष्ट्रीय लोक दल आणि भाजप यांच्यात जागावाटपाबाबत सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. केवळ काही जागांवर चर्चा अडली आहे.