महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे आणि जर राजीनामा घेतला नाही तर भाजपा राज्यभर आंदोलन करणार असल्याचाही इशारा काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
आज सकाळपासून पुणे येथील महापालिका कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या विरोधात निदर्शने सुरु केली आहेत. तसेच ठाण्यासह नागपूरमध्येही मलिक यांच्या राजीनाम्याबद्दल आंदोलन सुरु आहे. आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांकडून महा विकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. नागपूरमध्ये भाजपाने मलिक यांचा पुतळा जाळला आहे.
राजीनाम्याबद्दल भाजपा ठाम
या आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर ,निरंजन डावखरे सह अनेक नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले आहेत. जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत अशीच आंदोलने सुरु राहणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…
युद्धाच्या ठिणगीने कच्च्या तेलाचा भडका
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असून दाऊदच्या मदतीने मलिकांनी तीनशे कोटींची मालमत्ता केवळ ५५ लाखात खरेदी केल्याचा आरोप आहे. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या नावावरही अनेक मालमत्ता आहेत. काल मुंबईतील ईडी कार्यालयात बराच वेळ चौकशी केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने मलिकला आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे.