कर्नाटकातील सुलियामधील भाजपाचा युवा नेता प्रवीण नेत्तारू याला तीक्ष्ण हत्यारांनी ठार मारण्यात आल्याची घटना घडली आहे. आपले पोल्ट्रीचे दुकान बंद करून तो निघत असताना दोन बाईकस्वारांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्याने आपल्या दुकानाचे शटर खाली घेतले तेवढ्यात दोन युवक बाईकवरून त्याच्या दिशेने आले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण सुरा भोसकून प्रवीणला ठार मारण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत तो मृत झाला होता.
प्रवीण हा राजकारणात सक्रीय होता. मात्र त्याच्या मृत्यूमागे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विष्णूनगर येथील एका प्रकरणात तो होता, त्याचा या हल्ल्याशी संबंध आहे का हे तपासले जात आहे. बेल्लारे येथे एका मुस्लिम युवकाची हत्या झाली होती. प्रवीणच्या हत्येमुळे या परिसरात तणावाचे वातावरण असून तेथील दुकाने बंद करण्यात आली आहेत. स्थानिकांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.
हे ही वाचा:
तिन्ही सेनाप्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कारगिल शहीदांना केला सॅल्युट!
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
आक्षेपार्ह फोटो प्रकरणी अभिनेता रणवीर विरोधात गुन्हा दाखल
बब्बर खालसा संघटनेच्या दहशतवाद्याला एटीएसने घातल्या बेड्या
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेप्रती संवेदना व्यक्त केली असून दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. बोम्मई यांनी ट्विट केले आहे की, आमचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू याची हत्या करण्यात आली असून ही घटना अत्यंत निंदनीय आहे. दोषींना लवकरच अटक केली जाईल आणि त्यांना शिक्षा केली जाईल.
प्रवीण नेत्तारूच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध केला. बेल्लारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.