‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र भाजपने महापौरांना दिले असून इतर सदस्यांविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आहे. भाजपच्या सदस्यांना बैठकीत बोलण्याची संधी देत नसून बहुमताने प्रस्ताव मंजूर करत असल्याचे भाजपच्या सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला असून स्थायी समितीच्या नऊ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांना या पत्राच्या माध्यमातून अविश्वास ठराव मांडण्यासाठी तातडीची सभा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सभेचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने होत असून शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे अध्यक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर बोलू न देता कोणत्याही चर्चेविना बहुमताच्या आधारे हे प्रस्ताव मंजूर करत लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवत असल्याचे भाजपच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

कोविड काळातील गैरव्यवहार, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार, पोयसर नदी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचार आदी समस्यांवर सदस्यांना आवाजी मागणी करूनही बोलू दिले नाही. तसेच प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसतानाही प्रस्ताव विचारात घेतले गेले. याबाबत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये महानगरपालिकेची तातडीची सभा त्वरित बोलविण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अविश्वास व्यक्त करण्यासाठी ही तातडीची सभा बोलावण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

केंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे

टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली

आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार

आयकर खात्याच्या अहवालानुसार महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशाची अवैध अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर बोलू न देणे हे सर्व लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणूकीबद्दल हा अविश्वास व्यक्त करीत आहोत, असे महापौरांना दिलेल्या पत्रांत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी असे म्हटले आहे.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबईची अनेक विकासकामांचे प्रस्ताव हे मागील तहकूब सभेमुळे रखडलेले आहेत. ते मंजूर करणेही तेवढेच गरजेचे होते. सदस्यांना अनेक प्रस्तावांवर बोलूही दिलेले आहे. पण त्यानंतरही जर ते गोंधळ घालत असतील, तर आम्ही ते जुमानत नाही. मुंबईकरांना सेवा सुविधा मिळायला हव्यात.

Exit mobile version