पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्याची घटना काल म्हणजेच बुधवार, ५ जानेवारी रोजी पंजाब येथे घडली. या घटनेचा निषेध सर्वत्र केला जात असून पंजाबमधील काँग्रेस सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पण आता या घटनेच्या विरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा अडवल्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मुंबईच्या दादर भागात भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. दादर फुल मार्केट परिसरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ ही निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पंजाब मधील घटनेचा तीव्र निषेध केला. तर या संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन दोषींना शासन झाले पाहिजे अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
पहिल्या ‘ममी’ वरील संशोधन पूर्ण! ‘ही’ तथ्ये आली समोर
सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित
ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?
या आंदोलनाच्या वेळी भाजपा कार्यकर्ते काँग्रेस पक्ष आणि पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर या आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळत आंदोलन केले आहे. यावेळी चन्नी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर पंजाबमध्येही आज भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. पंजाबमध्ये भाजपाच कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले तर त्यांनी पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.