शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवसेना भवनावरील राड्यावरून केलेल्या वक्तव्याचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. आम्ही आंदोलनं करूच. उत्तर देण्याची वाट कसली बघताय?. भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला.
आशिष शेलार आज वर्ध्यात आले होते. वर्ध्यात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोळ वर संजय राऊत आणि अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ असं वक्तव्य केले होते. यावर शेलार यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागतं आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असा सल्ला शेलार यांनी दिला.
रामाला आणि राम मंदिराला बदनाम करण्याचं काम शिवसेनेकडून होत असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन होईल. ते करायचा आमचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते ते करतील. सत्ताधारी एवढे घाबरतात का हा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास चमत्कार घडेल अस वक्तव्य केले होते. त्यावरही शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. रोज रोज नवीन प्रयोग करणे आणि स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे हा उद्योग काही लोकांचा आहे. यात सामना आणि संजय राऊत हे अग्रणी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा :
२६ जूनला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्का जाम आंदोलन
शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करू
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट
अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
मुंबई येथील नालेसफाईवर मनसे आक्रमक झाली आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. मुंबईच्या नालेसफाईचा भांडाफोड हा मनसेपूर्वी भाजपाने पहिला केला. आम्ही नालेसफाईचे राऊंड घेतले. त्यात १०७ टक्के नालेसफाईचा दावा खोटा असल्याचं आम्ही दाखवून दिलं. या मुद्द्यावर मनसेने योग्य भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या महानगरपालिकेला खरंतर लाज वाटली पाहिजे. आम्ही जनतेला किती फसवतो, पण शिवसेनेला निर्लज्जपणे सत्ता चालवायची आहे आणि जनतेच्या मदतीच एकही काम करायचं नाही. अश्या पद्धतीच्या महानगरपालिकेच्या सत्ताधीशांना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असंही त्यांनी सांगितलं.