एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पाच राज्यांच्या निवडणुकांत दमदार कामगिरी करेल, असे अंदाज व्यक्त करणाऱ्यांचे रविवारी सगळे अंदाज अक्षरशः पोकळ ठरले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही प्रमुख राज्यांत भाजपाने काँग्रेसचा चिखल केला. याच चिखलात भाजपाचे कमळ फुलले. देशात हा अत्यंत धक्कादायक निकाल म्हणून मानला गेला. छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे असतानाही तिथे भाजपाने त्यांना सत्तेवरून खाली खेचले आणि सत्तेच्या खुर्चीवर पकड मिळविली. काँग्रेसने तेलंगणात मात्र भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसला धक्का देत सत्ता मिळविली.
मध्य प्रदेशात भाजपाने २३० पैकी १६२ जागांवर यश मिळवले तर काँग्रेसला ६७ जागांपर्यंतच झेप घेता आली. राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी भाजपाने ११६ जागी दमदार कामगिरी केली तर काँग्रेसला ६८ जागी यश मिळाले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला. ९० जागांपैकी भाजपाने ५४ जागी यश मिळविले तर काँग्रेसला मात्र ३६ जागा मिळाल्या. तेलंगणात मात्र काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसला सत्तेवरून खाली खेचताना ६४ जागा जिंकल्या तर बीआरएसला मात्र ३९ जागा मिळाल्या.
रविवारी चार राज्यांच्या निवडणुकांचे कल भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान या दोन मोठ्या आणि प्रमुख राज्यात भाजपाने सकाळपासून संपूर्ण बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. शिवराजसिंग चौहान यांनी महिलांसाठी मासिक ३००० रुपयांची घोषणा केली होती. त्या योजनेचा परिणाम दिसला. राजस्थानातील कायदा आणि सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार विशेषतः कन्हय्यालालची झालेली निर्घृण हत्या याचा फटका काँग्रेसला बसला. भाजपाने काँग्रेसच्या या दिरंगाईवर प्रचंड टीका केली. जनमानसातही प्रचंड संताप होता. त्यातच काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत संघर्षही त्याला कारणीभूत ठरला. भाजपाने यातूनच आपला यशाचा मार्ग व्यापक केला.
हे ही वाचा:
हवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला
मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव
मुंबई विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास
कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट
छत्तीसगडमध्येही महादेव ऍपचा मुद्दा, नक्षलवादात झालेली वाढ, आदिवासींची समस्या, धर्मांतरण अशा सगळ्या मुद्द्यांवरून भाजपाने काँग्रेसला घेरले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. तेलंगणात मात्र काँग्रेसने बीआरएसचा सुपडा साफ केला. राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे येत असलेल्या बीआरएसला आपल्या प्रदेशातही जिंकता आले नाही. मुख्यमंत्री केसीआर यांनाही आपली जागा गमवावी लागली.सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपाने प्रारंभापासूनच आघाडी ठेवली आणि नंतर बहुमताच्या दिशेने वाटचालही केली.
मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली त्यातील २१५ जागा जिंकणारा पक्ष बहुमत घेणार होता. तर छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी ४६ जागा जिंकणारा पक्ष बहुमत घेणार आहे. राजस्थानात १९९ जागांपैकी १०० पेक्षा अधिक जागा जिंकणारा पक्ष बहुमत मिळविणारा आहे.
राजस्थान (१९९)
भाजपा ११६
काँग्रेस ६८
मध्य प्रदेश (२३०)
भाजपा १६२
काँग्रेस ६७
छत्तीसगड (९०)
भाजपा ५४
काँग्रेस ३६
तेलंगणा (११९)
काँग्रेस ६४
बीआरएस ३९