भाजपाची माघार, ऋतुजा लटके बिनविरोध

भाजपाची माघार, ऋतुजा लटके बिनविरोध

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं नक्की झालं आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आदेश आला असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मुरजी पटेल अपक्षही लढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आवाहन केलं होतं. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अंधेरी विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करा. त्यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. रमेश लटके यांचे विधिमंडळातील योगदान आणि उमेदवार निवडून येण्याचा कालावधी बघता ही निवडणूक बिनविरोध व्हावी. लटके यांच्या जागी राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही असं आवाहन केलं होतं.

भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार सोमवारी सकाळीच भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यात भाजपाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी हेदेखील उपस्थित होते. शेवटी मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला.

ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. ३ नोव्हेंबरला मतदान होणार होते. श्रीमती लटके या महापालिकेत नोकरीत असल्यामुळे त्यांनी २ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. पण तो नामंजूर करण्यात आला. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत खूप धावपळ करून आणि न्यायालयात दाद मागून महापालिकेने राजीनामा मंजूर केला.

Exit mobile version