उत्तर प्रदेश मधील जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा बोलबाला राहिला आहे. एकूण ७५ जागांपैकी ६७ ठिकाणी भाजपाचा विजय झाला आहे. तर ६ जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ७५ जागांपैकी २२ जिल्ह्यांमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली असून २२ पैकी २१ जागा भाजपाने खिशात घातल्या आहेत. तर उरलेल्या एका जागेवर समाजवादी पार्टीला यश मिळाले आहे.
७५ जागांपैकी उर्वरित ५३ जागांवर मतदान पार पडले असून त्याचे निकाल आज म्हणजेच शनिवार, ३ जुलै रोजी घोषित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील ५३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान पार पडले. यापैकी बहुतांश ठिकाणी समाजवादी पार्टी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. ५३ पैकी ३७ जागा या अशा होत्या जिथे केवळ दोनच उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. पण या साऱ्याच निवडणुकांमध्ये भाजपाने समाजवादी पार्टीला एक हाती धोबीपछाड दिला आहे.
हे ही वाचा:
भाजपापाठोपाठ रासपही ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक
अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात बोलणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा
ठाकरे सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय
दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे
ज्या ५३ ठिकाणी मतदान पार पडले त्यापैकी ३६ ठिकाणी समाजवादी पार्टीला आघाडी असल्याचे म्हटले जात होते. पण बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांनी सारे समीकरण बदलली असे सांगितले जात आहे. पण तसे असले तरीही या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे यश कोणीही नाकारू शकत नाही.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांना अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला मिळालेले हे यश महत्वाचे मानले जात आहे. तर समाजवादी पक्षासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.