सर्वत्र लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू असून प्रचार सभांनाही वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजयाचे खाते उघडले आहे. सूरतची जागा भाजपाने बिनविरोध जिंकत आपल्या खिशात टाकली आहे.
सुरतमध्ये भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते बिनविरोध निवडणून आले आहेत. सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल.
दरम्यान, बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरात भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला आहे. आता निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल.
हे ही वाचा:
घराणेशाहीच्या कारखान्याला लोकांनी कुलूप लावले; राहुल, अखिलेश शोधत आहेत चाव्या!
देशाच्या कर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ
अमेरिकेचा पाकला झटका, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी!
बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी
पुढे, गुजरातच्या २५ जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मागील वेळी गुजरातमधील सर्व २६ जागा जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले होते. काँग्रेसला तेव्हा एकही जागा जिंकता आली नव्हती. मुकेश दलाल हे सूरत भाजपाचे महासचिव असून, ते सूरत महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चाचे राज्य स्तरावर काम केले आहे. मुकेश दलाल हे तीनवेळा नगरसेवक, पाचवेळा स्थायी समिती अध्यक्ष राहिले असून गुजरात भाजपा अध्यक्ष श्रीआर पाटील यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे.