भाजपानं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपानं ३५ काँग्रेसनं १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे ३६ सदस्य होते.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळालं आहे. एकहाती सत्ता काबीज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे.
५८ जागेवर निवडणूक असली तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपाचे २ खासदार, २ आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी ३३ या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपानं ३५ जागा जिंकत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजपा ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचा समावेश होता.
हे ही वाचा:
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं
जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा
पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा
तुरळक अपवाद वगळता मतमोजणी शांततेत पार पडली. गर्दी केल्यानं एकदा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.