देशातील पाच राज्यांत झालेल्य़ा निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचणीचे अंदाज जाहीर झाले असून राजस्थानात भाजपा बाजी मारणार असे संकेत आहेत तर काँग्रेसला मात्र राजस्थानातील सत्तेच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागेल असे हे अंदाज म्हणत आहेत. मध्य प्रदेशातही भाजपाची चलती असून ते आपले सरकार राखतील अशी शक्यता विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसची सत्ता कायम राहण्याची चिन्हे आहेत मात्र तेलंगणात उलटफेर होऊन भारत राष्ट्र समितीची सत्ता काँग्रेस हिसकावून घेईल अशी चिन्हे आहेत.
गुरुवारी विविध संस्थांनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर केल्या. त्यातील नऊ चाचण्यांत छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखेल अशी चिन्हे आहेत. भूपेश बघेल यांच्यावर जनता विश्वास ठेवेल अशी शक्यता आहे. ४० ते ५० जागा त्यांना या निवडणुकीत मिळू शकतील. ९० जागांपैकी ४६ जागा ज्याच्याकडे असतील त्याला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल. एनडीटीव्हीच्या मते ३८ जागा भाजपाला मिळू शकतील. जवळपास सगळ्यांनी छत्तीसग़डमध्ये काँग्रेस भाजपाच्या तुलनेत सरस ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशात मात्र भाजपाच सरस असेल. तिथे मात्र काँग्रेसला संधी मिळणार नाही. शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुन्हा येऊ शकते. नऊ चाचण्यांत २३० पैकी १२४ जागी भाजपाला संधी आहे. ११६ हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेस कशीबशी शतकी आकडा गाठेल असे म्हटले जात आहे.
न्यूज २४ चाणक्यने भाजपाला मध्य प्रदेशात १५१ जागा दाखविल्या आहेत. तर काँग्रेसला ७४. मध्य प्रदेशात भाजपाने दीर्घकाळ सत्ता काबीज केलेली आहे. शिवराज हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. एबीपी न्यूज सी व्होटर, जन की बात आणि दैनिक भास्करने मात्र काँग्रेसला मध्य प्रदेशात वरचढ ठरविले आहे.
राजस्थानात काँग्रेस आणि भाजपात जोरदार चुरस पाहायला मिळेल. पण अशोक गेहलोत यांचे सरकार होणार नाही, असे संकेत मिळत आहेत. नऊपैकी सात चाचण्यात भाजपाला सहज विजय मिळेल असे दाखविण्यात आले आहे. तर २ चाचण्यात काँग्रेसला संधी दाखविण्यात आली आहे. १९९ जागांपैकी १०१ हा बहुमताचा आकडा आहे.
हे ही वाचा:
९७ तेजस विमाने, १५० हुन अधिक लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस सरकारने दिली मंजुरी!
दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?
योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग
समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही
मिझोराममध्ये भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष अर्थात मिझो राष्ट्रीय आघाडीला दोन चाचण्यात विजय मिळविण्याची शक्यता आहे. ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो आघाडीला १५ जागा तर झोराम पिपल्स मूव्हमेंटला १७ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
तेलंगणात मात्र २०१४पासून काँग्रेस सत्तेपासून लांब आहे. पण यावेळी त्यांना सत्तेची चव चाखायला मिळेल अशी शक्यता चाचण्यांमधून वाटते आहे. भाजपाला ५ ते १३ जागा मिळण्याची शक्यता दाखविण्यात आली आहे. काँग्रेसला जे यश या पाच राज्यातील निवडणुकात मिळणार आहे, त्यातून इंडी आघाडीत मात्र आणखी मोठा तडा जाण्याचीच शक्यता आहे.