लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांमधून युतीची नवी समीकरणे समोर येत आहेत. एककडे देश पातळीवर एनडीए भक्कम होत असताना दुसरीकडे भाजपाने पंजाबमध्ये ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. ओडिशामध्येही बिजू जनता दलासोबत भाजपाने पुढे न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबमध्येही भाजपा लोकसभेसाठी स्वतंत्र लढणार आहे.
अकाली दल आणि भाजपा यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू होती. मात्र, यातून काहीही निष्पन्न न झाल्याने भाजपा एकट्याने लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस हे ‘इंडी’ आघाडीतील दोन घटकपक्ष वेगवेगळे लढणार आहेत. त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा असून त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये जागावाटपावरून बोलणी सुरु होती.
अकाली दलाने २०१९-२० मध्येच भाजपाची साथ सोडली होती. परंतु, पुन्हा काही वर्षांनी हे पक्ष एकत्र आले होते. शिवसेनेनंतर भाजपाची साथ सोडणारा अकाली दल हा दुसरा मोठा पक्ष होता. आता पुन्हा या दोन्ही पक्षांत युती होणार नसल्याचे चित्र आहे. शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये ९ जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला होता. तर, भाजपाला चार जागांची ऑफर दिली होती.
हे ही वाचा:
पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’
सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणौतचा पलटवार!
ओम बिर्ला यांना टक्कर देण्यासाठी प्रल्हाद गुंजाळ मैदानात!
बंगळूरूमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्या २२ नागरिकांना लाखोंचा दंड
भाजपाचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी अकाली दल आणि भाजपा यांच्यात युती होणार नसल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील लोकांच्या भल्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये भाजपा एकट्याने निवडणूक लढविणार आहे. लोकांचे मत, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत, नेत्यांची मते जाणून घेऊन जवान, शेतकरी, व्यापारी आणि मजुरांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जाखड यांनी म्हटले आहे.