कर्नाटकमध्ये भाजपाची फक्त ०.४ टक्के मते कमी झाली

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

कर्नाटकमध्ये भाजपाची फक्त ०.४ टक्के मते कमी झाली

साऱ्या देशाचं लक्ष असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणुकीचा देशातील राजकारणावर किंवा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

“कर्नाटकात सलग कोणतेच सरकार येत नाही. पण यावेळी हा कल आम्ही तोडू, असं वाटतं होतं. पण, तसं झालं नाही. २०१८ साली भाजपाच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाले होती. आता भाजपाला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते भाजपाची कमी झाली आहेत. तसेच, ४० जागाही कमी झाल्यात. भाजपाची मते कमी झालेली नाहीत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“२०१८ साली काँग्रेसला ३८ टक्के, तर जेडीएसला १८ टक्के मते मिळाली होती. जेडीएसची ५ टक्के मते कमी झाली आहेत. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे,” असे मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

स्तूपांचे शहर ‘सांची’त आता भरपूर सौर ऊर्जा

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

”द केरळ स्टोरी” पोहोचला १०० कोटींच्या जवळ

देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड

“काही लोकांना असं वाटत आहे की ते जवळपास देशच जिंकले आहेत. पण त्यांनी पूर्वीचे विधानसभा आणि नंतर लोकसभेचे निकाल पाहिले पाहिजेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले असून तिथे भाजपाने एकहाती सत्ता आणली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.

 

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार आहे. कर्नाटकातील निवडणुकीचा देशात आणि महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version