भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ७५ हजार पत्र पाठवणार आहे. या पत्रांधून १५ ऑगस्ट २०२१ हा भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आहे, असा मजकूर पाठवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी नुकताच झालेला स्वातंत्र्यदिन हिरक महोत्सवी आहे की अमृतमहोत्सवी, अशी विचारणा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘मी असतो तर कानाखालीच दिली असती.’ असे वक्तव्य केले. राणेंच्या याच वक्तव्याचा मुद्दा बनवतं शिवसेनेने राज्यभर राडे केले आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण केला. दरम्यान नारायण राणेंना पोलिसांनी या वक्तव्याचे कारण देत ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा नारायण राणेंना कोर्टाने जमीन दिला होता.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून ऊस शेतकऱ्यांना मोठी भेट
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’
भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर भाषणात त्यांनी हा अमृतमहोत्सव आहे की हिरक महोत्सव अशी विचारणा केली होती. त्यांच्या मागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी विचारले तेव्हा त्यांनी हा अमृतमहोत्सव असल्याचे सांगितले. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर प्रचंड टीका झाली होती. तोच आधार घेत नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली होती.
बुधवारी या विषयावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी भाजपा ७५ हजार पत्रांच्या सहाय्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आठवण करून देईल अशी घोषणा केली.