ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात आम्ही येत्या २६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
राज्य सरकार नौटंकी करत आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने हा विषय हाताळायचा आहे, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असं मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा :
शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करू
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट
अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार
आम्ही ओबीसींच्या हक्कांसाठी काहीही करायला तयार आहोत. पक्ष आणि राजकारणाचा विषयच येत नाही. मात्र, २६ तारखेला चक्काजाम आंदोलन असल्याने मी आंदोलनात असेन. त्यामुळे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही, असं त्या म्हणाल्या.