महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाकरे सरकार विरोधात शंखनाद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मंदिर हम खुलवायेंगे, धर्म को न्याय दिलायेंगे’ असे म्हणत भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे. भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधकी नियमावलीच्या नावाखाली ठाकरे सरकारने राज्याला लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकवले. या नंतर नियमात शिथिलता आणताना सत्ताधाऱ्यांचे राजकीय कार्यक्रम राजरोज होताना दिसत होते. तर हॉटेल, मद्यालय आणि इतर व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले. पण राज्यातील मंदिरे उघडण्यावर प्रतिबंध घालून देवांना मात्र बंदिस्त ठेवले गेले.
हे ही वाचा:
कोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?
मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी
काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका
भारतीय जनता पार्टी तर्फे सुरुवातीपासूनच राज्यातील मंदिरे खुली केली जावीत यासाठी मागणी करण्यात येत होती. तर लवकरात लवकर देवालये सुरु करावी अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही भाजपाने दिला होता. त्यानुसार आता भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे येत्या सोमवारी भाजपकडून आंदोलन केले जाणार आहे. जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकार विरोधात राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करणार असल्याचे भाजपाने घोषित केले आहे. राज्यातील सर्व प्रमुख मठ-मंदिरांच्या बाहेर हे आंदोलन होणार आहे. तर राज्यातील अनेक संत, वारकरी, धर्मगुरू या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.