मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

मुंबईतील भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेच्या विरोधात आक्रमक झाली आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या विरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेमधील भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

गेले काही दिवस देशातील किनारपट्टीलगतच्या राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला दिसत आहे. यात महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकट्या मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. पण वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या महापालिका प्रशासनाकडून हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हे ही वाचा:

‘ते’ टूलकिट बनवणाऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा

मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर १८ मार्च २०२१ पासून प्रलंबित आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपाकडून केला गेला आहे. येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी आणि प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ करावा. असे झाले नाही तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.

तोक्ते चक्रीवादळासाठी प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा महापालिकेकडून करण्यात आला. पण या नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असे भाजपाने म्हटले आहे. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला न केल्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळनाही. मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. रस्त्यावरिल पालापाचोळा उचलण्यासाठीची यंत्रणाही तोकडी पडल्याचे चित्र समोर आले आहे.

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गाड्यांची नासधूस झाली असून बरीच वित्तहानीही झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.

Exit mobile version