ठाणे महानगरपालिकेच्या आणि सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराविरोधात ठाण्यातील भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून कोविड लस घेतली आणि महापालिकेने अनावश्यक खर्च करत ७० लाखांची वाहन खरेदी केली या मुद्द्यांवरून भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.
ठाणे शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असून या बालेकिल्ल्यात शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. गेली अनेक वर्ष ठाणे महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेच्या कारभारावर संधी मिळेल तिथे भाजपा आघात करताना दिसते. भाजपाने अशीच एक सणसणीत चपराक शिवसेनेला लागावलेली आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी भाजपातर्फे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. “कोरोना योद्धे ठाण्याचा अभिमान आहेत, लास त्यांचा अधिकार आहे. महापौर,आमदारांनी लाईनीत घुसुन त्यांचा अपमान केला आहे.” असा मजकूर या बॅनर्स वर वाचायला मिळतो. तर या सोबतच “ठाण्यात कोवीड केसेसची होत्ये वाढ, पालिका मात्र पुरवत्ये महापौरांचे लाड” असे काव्यात्मक चिमटे शिवसेनेला काढले आहेत. ठाणे महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नावाने हे बॅनर्स लागले असून डुंबरे यांनी या विषयात डंकाशी बातचीत केली आहे.
“महाराष्ट्रात कोविडची स्थिती बिकट झालेली असून दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या लसीवर लोकप्रतिनिधी डल्ला मारताना दिसत आहेत. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी कोविडची लस घेतली आहे. इतरही काही लोकप्रतिनिधींनी लस घेतल्याची माहिती मिळत आहे. बाकी कोणत्याही शहरातील महापौर अथवा लोकप्रतिनिधींनी लस घेतली नाहीये. पण ठाण्याच्या महापौरांनी मात्र सर्व कोविड योध्यांचा अपमान करत लास घेतली आहे.” अशी प्रतिक्रिया डुंबरे यांनी दिली.
“ठाणे महापालिका अशा बिकट परिस्थितीतही महापौरांचे आणि इतर नेत्यांचे लाड पुरवत आहे. एकीकडे अनेक महत्वाच्या लोकोपयोगी कामांसाठी निधी नसल्याचे महापालिका सांगते, पण दुसरीकडे नेत्यांच्या गाड्या खरेदी करण्यासाठी थोड्या थोडक्या नाही तर ७० लाख रुपयांचा अनावश्यक खर्च केला जात आहे. हे सारेच विषय अतिशय गंभीर असून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचा निषेध करतो” असेही मनोहर डुंबरे यांनी सांगितले. तसेच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या विषयांवरून फैलावर घेणार असल्याचेही भाजपा गटनेते मनोहर डुंबरे यांनी म्हटले आहे.