केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामतीच्या दाैऱ्यावर येणार आहेत. त्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांची इंदापूरमध्ये आढावा बैठक झाली. या बैठकीत भाजपचे नेते राम शिंदे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. अमेठीचा कार्यक्रम थाेडक्यात हुकला, अमेठीचा कार्यक्रम केलाच आहे, आता टार्गेट बारामती आहे असं राम शिंदे यांनी आढावा बैठकीत केलेच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा हाेत आहे.
दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येताे, उन्हाळा गेला आता पावसाळा आला आहे असा टाेला बारामतीत प्रस्थापित राष्ट्रवादी काॅंग्रेसला लगावतानाच राम शिंदे यांनी भविष्यातील राजकीय बदलांचे संकेत दिल्याचं बाेललं जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या २२, २३ आणि २४ सप्टेंबरला बारामतीच्या दाैऱ्यावर येत आहे. सीतारमण यांचा तब्बल तीन दिवस बारामतीत मुक्काम राहणार आहे. त्यातील एक दिवस त्या इंदापूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भाजपने बारामतीत जाेरदार तयारी सुरू केली आहे. त्या निमित्तानेच ही आढावा बैठक घेण्यात आली हाेती.
या बैठकीत बाेलताना राम शिंदे म्हणाले की, “A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं की बारामती. A चा कार्यक्रम २०१९ ला केला, २०१९ ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो आता २०२४ ला करायचा आहे. त्याच्यासाठीच १७ महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन असं-तसं नसून या या ठिकाणी देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येतं. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे.
हे ही वाचा:
शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…
पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…
‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’
‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’
भाजप नेते राम शिंदे यांनी यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “मागील दोन महिन्यात कोणाकोणाला नोटीस आल्या यावरून तुम्हाला कळाले असेलच की ही निवडणूक किती सीरियस लढणार आहे की नाही. काहींच्या चेहऱ्याकडे बघितले की लगेच लक्षात येते, नाव घ्यावं लागत नाही.” असं म्हणत राम शिंदे यांनी कर्जत जामखेडचे आमदार राेहित पवार यांनाही टाेला लगावला आहे.
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ निश्चित केले आहे. या मिशनची सुरुवात शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून होणार आहे. भाजपने बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे सोपवली आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सीतारणम बारामती दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आता टार्गेट बारामती असं वक्तव्य करत २०२४ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच जाेरदार तयारी सुरू झाली असल्याचे संकेत राम शिंदे यांनी दिले आहेत.