भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना वादग्रस्त विधान केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
एका वाहिनीवर चर्चेदरम्यान पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. त्यावरून आता नुपूर शर्मा यांना हटविण्यात आले आहे. धार्मिक एकजूटीत भाजपा विश्वास ठेवते. भाजपा कोणत्याही धर्माच्या पूजनीय, वंदनीय प्रतिकांचा अपमान कधीही स्वीकारू शकत नाही. कोणत्याही धर्म आणि संप्रदायाच्या भावनांचा अपमान करणे भाजपाला मान्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे राष्ट्रीय सचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी केले आहे.
रविवारी यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म विकसित झाला आहे. भाजपा सर्व धर्मांचा सन्मान करते. भाजपा कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक व्यक्तींच्या अपमानाचा निषेध करते. असा अपमान करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात भाजपा आहे. अशा विचारधारेचा प्रचार भाजपा करत नाही.
हे ही वाचा:
“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”
…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, तिघांचा मृत्यू
अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा
पक्षातर्फे हे देखील सांगण्यात आले की, भारताच्या संविधानातून प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार दिला आहे. भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी भारताला महान देश बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, ज्या भारतात सर्वांचा सारखाच सन्मान राखला जातो, सगळ्यांचे समान लेखले जाते. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आम्ही सगळेच कटीबद्ध आहोत.
नुपूर शर्मा यांनी या चॅनेलवर केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायात संतापाचे वातावरण होते आणि त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.